स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची प्रखर देशभक्ती आणि विज्ञाननिष्ठा आजही प्रेरणादायी आहे अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली. नाशिक जिलह्यात भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकावर विविध संस्थांनी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी आज सकाळीच भगूर इथं भेट दिली. पंचवटी भागात नाशिक महापालिकेनं बांधलेल्या सावरकर स्मारकात विविध संस्थांचे अभिवादन कार्यक्रम झाले. सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्थेच्या स्मारकाच्या नूतनीकरणाला आज प्रारंभ करण्यात आला राज्य शासनाच्या वतीने या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजपा अशा विविध पक्षांच्या वतीनेही अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातही सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. चंद्रपूरच्या कला अध्यापक संघानं सावरकरांच्या चरित्रातल्याप्रसंगांची चित्रं रेखाटून श्रद्धांजली वाहिली.