दाओसमधील जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

 


मुंबई (वृत्तसंस्था) : दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज टेट्रापॅक आणि ज्युबिलंट फूड्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दाओसमध्ये भेट घेतली. टेट्रापॅक महाराष्ट्र गुंतवणूक करायला उत्सुक आहे तर ज्युबिलंट फूड्सनं गुंतवणूक वाढवण्याची तयारी दाखवल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर ट्विटरवर दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिकच्या समस्येवर कठोर उपाययोजनेसाठी आयोजित चर्चासत्रात जागतिक स्तरावर धोरणात्मक बदल आणि व्यावसायिक भागीदारी या विषयावर मार्गदर्शन केलं. याशिवाय त्यांनी जागतिक आर्थिक मंचाचे तंत्रज्ञान प्रमुख ऑलिव्हर श्वाब यांची भेट घेऊन पर्यावरण बदल आणि मानवावर होणारे त्याचे परिणाम कमी करण्यासाठीच्या पर्यायांवर चर्चा केली. ठाकरे यांनी आज नेदरलँडच्या पर्यावरण मंत्री विवियान हेईजेन यांचीही भेट घेऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर नेदरलँडच्या मुंबईतल्या दुतावासाच्या मदतीनं काम करण्यावर कटीबद्धता व्यक्त केली. अवकाश क्षेत्रात व्यावसायिक सुविधा पुरवणाऱ्या वोयाजर S H कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी मॅथ्यू कुटा यांचीही ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राबरोबरच्या संभाव्य भागिदारीसंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.