लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडनवीस यांचा दावा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. १२ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाकडून सत्यजीत कदम ही निवडणूक लढवत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदार खासदारांनी प्रचारात हजेरी लावली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे सभा घेतली. या पोटनिवडणुकीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क  बजावावा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावं, असं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारनं पूरग्रस्तांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असं ते म्हणाले. पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत भाजपाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला, आता कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल, शिवसेनेचे सगळे मतदार भाजपासोबत आहेत असं ते म्हणाले. महाराष्ट्र केसरी विजेत्या कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटील याला भाजपाच्या वतीनं ५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.