भारताबरोबर शांततामय आणि सहकार्याचे संबंध वृद्धिंगत करायला पाकिस्तान उत्सुक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताबरोबर शांततामय आणि सहकार्याचे संबंध वृद्धिंगत करायला पाकिस्तान उत्सुक असल्याचं पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री मोहम्मद शाहबाझ शरीफ यांनी म्हटल्याचं पाकिस्तानची वृत्तसंस्था बिझनेस रेकॉर्डर नं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांच्या पदग्रहणानंतर  त्यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाला शरीफ यांनी प्रतिसाद दिल्याचं यात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधल्या वादग्रस्त मुद्द्यांवर सामंजस्यानं तोडगा काढण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान पाकिस्तानच्या नव्या फेडरल कॅबिनेटमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे १२ मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सात मंत्री असतील, असा अंदाज पाकिस्तान ऑब्सर्व्हर या वृत्तपत्रानं व्यक्त केला आहे. तर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टी येत्या २४ एप्रिल रोजी मीनार-ए-पाकिस्तान इथं देशातल्या सत्तांतरामागे असलेल्या कथित परकीय षड्यंत्राच्या विरोधात 'विशाल सार्वजनिक मेळावा' घेणार आहे, असं वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रानं दिलं आहे.