न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था - राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था असून सर्व नागरिकांना समान न्याय मिळण्याचा अधिकार आहे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती  आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांच्या हस्ते नर्मदा जिल्ह्यात गुजरात उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लवाद आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

लवाद अर्थात मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयातले अनेक प्रलंबित खटले सामंजस्याच्या आधारावर निकाली काढले जातात. यामुळे न्यायालयाचा अमुल्य वेळही वाचतो, असं त्यांनी सांगितलं. देशात कोरोना संकटाशी युद्ध अजून सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षण आणि दूरस्थ पद्धतीनं व्यवहार सुरु असताना न्यायालयांमध्येही खटल्यांची सुनावणी ऑनलाईन  पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर झाली. त्यायोगे भविष्यात न्याय प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्व अधोरेखित झाल्याचं त्यांनी सांगितलं.