प्रधानमंत्री संग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि काळानुरूप उत्क्रांत होणं हे भारतीय लोकशाहीचं महत्त्वाचं  वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील “प्रधानमंत्री संग्रहालया”चं उद्‌घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते. 

स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारनं देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारलेलं हे संग्रहालय सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल, असं मोदी म्हणाले. ग्रामीण भागातून आलेला, गरीब घरातला मुलगा आज पंतप्रधान होतो, हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, असं सांगून देशातल्या प्रत्येक नागरिकानं एकदा तरी या संग्रहालयाला भेट द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.