महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध- स्मृती ईराणी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा आत्मसन्मान सुरक्षित राखण्यासाठी सध्याचं सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत मिशन पोषण, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम अंगणवाडी या चार मुद्द्यांवर आयोजित चौथ्या विभागीय कार्यशाळेला संबोधित करत होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी वन स्टॉप सेंटरची घोषणा त्यांनी केली. या बाबतीत विविध राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांची माहिती त्यांनी दिली. महिला आणि बालविकासाकरता यंदाच्या अर्थसंकल्पातली तरतूद १४ टक्के जास्त आहे. राज्यांना यासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याची सुनिश्चितता यावेळी पहिल्यांदाच झाली आहे, असं त्या म्हणाल्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं सुमारे साडेसहा टक्के नुकसान अस्वच्छतेमुळे होतं, असं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं होतं. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वच्छतेनं करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोदी सरकारनं ११ कोटी नवी शौचालयं बांधली, तसंच ६ लाखापेक्षा जास्त गावं हगणदारीमुक्त केली आहेत, असं त्यांनी सांगितलं.