युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन जर्मनीचे प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्ज़ आणि फ्रान्सचे अधयक्ष एमॅन्युएल मॅक्रोन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं आहे. युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून या नेत्यांनी पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, असं जर्मनीच्या सरकारी प्रवक्त्यानं सांगितलं. त्याआधी स्कोल्ज यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आणि युक्रेनमधल्या स्थितीबाबत चर्चा केली, असं या प्रवक्त्यानं सांगितलं. या तिन्ही नेत्यांच्या दूरध्वनी संवादात मोकळेपणा होता. मात्र यावेळी पुतिन यांनी आपण युक्रेनमधला संघर्ष थांबवणार की, नाही याबाबत कसलेही संकेत दिले नाही, असं फ्रान्सच्या अध्यक्षाच्या कार्यालयानं सांगितलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या चर्चेच्या सद्यस्थितीबाबत पुतिन यांनी या दोन्ही नेत्यांना माहिती दिली. आणि त्यांच्या बोलण्यावर प्रतिसादही दिला. संपर्कात राहण्यायाबाबत तिन्ही नेत्यांचं एकमत झालं, असं रशियानं म्हटलं आहे.