इंधनांच्या वाढत्या किंमतीं विरोधात केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. यामुद्द्यावरून राज्यसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती पण ती मागणी सभापती वैंकय्या नायडू यांनी स्वीकारली नाही त्यामुळे चर्चेच्या मागणीचा जोर धरत सभासदांनी गदारोळ सुरु केला. दरम्यान पश्चिम बंगाल इथल्या बिरभूम जिल्ह्यातल्या हिंसेसंदर्भातला मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केल्यानं सभागृहात एकच गोंधळ झाला, त्या पार्श्वभूमीवर सभापतींनी कामकाज तहकूब केलं. लोकसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यातही अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गोंधळ वाढल्यानं सभेचं कामकाज अध्यक्षांनी दुपारपर्यंत तहकूब केलं.