महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. ७४ धावांच्या मजबूत सलामीनंतर भारतानं त्याच धावसंख्येवर, सलामवीरांसह ३ खेळाडू गमावल्यानं भारताच्या धावगतीला खीळ बसली. त्यामुळे निर्धारीत ५० षटकांत भारत ७ गडी बाद २२९ धावा करू शकला. भारताच्या वतीनं यास्तिका भाटिया हीनं सर्वाधिक ५० धावा केल्या, तर बांग्लादेशाच्या रितू मोनी हीनं भारताच्या ३ खेळाडूंना बाद केलं.त्यानंतर विजयासाठी २३० धावांचा पाठलाग करणाऱ्या बांग्लादेशाची फलंदाजी भारताच्या गोलंदाजीसमोर गडगडली. अठराव्या षटकातच त्यांचा अर्धा संघ केवळ ३५ धावांत तंबूत परतला होता. बांग्लादेशाच्या लता मोंडल आणि सलमा खातून यांनी बांग्लादेशाचा डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतरानं त्यांचे खेळाडू बाद होत गेल्यानं बांग्लादेशाचा डाव ४० षटकं आणि ३ चेंडूंमध्ये केवळ ११९ धावांतच आटोपला.भारताच्या वतीनं स्नेहा राणा हीनं ४, झुलन गोस्वामी आणि पुजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी २, तर राजेश्वरी गायकवाड आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी १ खेळाडू बाद केला.अर्धशतकी खेळी केलेल्या यास्तिका भाटिया हीला सामानावीर पुरस्कारानं गौरवलं गेलं. या विजयासह भारताचे ६ गुण झाले असून, गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतला भारताचा अखेरचा साखळी सामना येत्या २७ मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.