जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने काल सन्मानित करण्यात आले. पश्चिम झोनमधल्या उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतला तिसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातल्या सुर्डी ग्रामपंचायतीला मिळाला. सुर्डी गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे.

दापोली इथल्या नारगोली धरणाच्या पुनरूज्जीवनाची मोहीम यशस्वी करुन दापोली नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली. याबाबत दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले. उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद इथल्या ग्रामविकास संस्था आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तर‍ित्या त‍िस-या क्रमांकांचा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांपासून कार्य करत आहे. त्या संस्थेने चित्ते नदी खोऱ्यात चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले आहे. मुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये ॲग्रोवन, सकाळ मिडीया प्रा. ली. या संस्थेला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.