हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत  जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक वाहनांच्या पथदर्शी प्रकल्पाचं  नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

हायड्रोजन आधारित इंधन सेलच्या इलेक्ट्रीक वाहनांच्या जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा पहिला प्रकल्प असेल. वेगवान प्रकल्प आर्थिक विकास साधण्याबरोबरच स्वच्छ ऊर्जा आणि कमी कार्बनयुक्त रस्ते असणं देशाची गरज आहे. हायड्रोजन हा ऊर्जा धोरणाचा मुख्य घटक असून कमी कार्बन उर्जा मार्गांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही ते म्हणाले.