शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सर्वांनी मिळून काम करूया – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

  शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सर्वांनी मिळून काम करूया – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून काम करूया, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन लहान लहान पर्यावरणपूरक सवयींचा अंगिकार केल्यास हे बदल रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क आणि स्त्री आधार केंद्रामार्फत आयोजित हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत जागृती निर्माण करणाऱ्या ‘मंथन’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन श्री.ठाकरे यांनी केले. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, संपर्क आणि स्त्री आधार केंद्राचे विश्वत आणि सदस्य, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, राजकारण हे तळागाळापर्यंत पोहोचणारे आणि कामाच्या माध्यमातून समाधान देणारे क्षेत्र आहे. या माध्यमातून विधिमंडळ सभागृहातील चर्चेपासून गावपातळीपर्यंत वातावरणीय बदलाबाबत मंथन होऊ लागले आहे, ही अत्यावश्यक आणि सकारात्मक बाब आहे. वातावरणीय बदल स्वीकारून ते रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे. माझी वसुंधरा अभियान राबविताना याचा अनुभव येत असून गावपातळीपर्यंत प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने युनिसेफ सोबत शालेय अभ्यासक्रमासाठी तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत वातावरणीय बदलाबाबत काम करण्यासाठी करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. राजकारण करताना संपर्क आणि त्यातील संवाद हा गरजेचा असून संवेदनशील राहून लोकांचा आवाज ऐका, अशी शिकवण मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रात देशात आघाडीवरचे राज्य आहे. तथापि ज्या क्षेत्रात अजूनही आपल्याला चांगले काम करायचे आहे त्याबाबत राज्याने निती आयोगासारख्या केंद्रीय संस्थांसमोर आपले काम दाखवून देण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होत असलेले काम कौतुकास्पद आहे. यात सखोल काम होण्याच्या दृष्टीने पाणी, हवा, शेती, घनकचरा अशा विविध क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी आयोजित ‘मंथन’ परिषदेत तज्ज्ञांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वातावरणीय बदलांबाबत विधिमंडळ सभागृहाबरोबरच गावपातळीवरही मंथन होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

ही परिषद दोन दिवस चालणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने मंथन करणार आहेत.

यानंतर दुसऱ्या सत्रात दिल्ली येथील परवी संस्थेचे अजय झा यांनी जग, भारत आणि महाराष्ट्र: हवामान बदल आणि शाश्वस्त विकास उद्दिष्टे यांची सांगड याबाबत वृत्त मांडणी केली. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात हवामान बदल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यावरील कामाची गरज याबाबत श्री.अमित मलिक, प्रशांत गिरबाने यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर शाश्वस्त विकासाची उद्दिष्टे ऊर्जा आणि हवेची गुणवत्ता यावर प्रियदर्शिनी कर्वे, शिरीष फडतरे तर जमीन, पोषण आणि शेती दिलीप गोडे, रमेश भिसे त्याचबरोबर पाणी याविषयावर अभिजीत घोरपडे, आरोग्यावर डॉ.संदीप साळवी, शिक्षण संदर्भात संस्कृती मेनन, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती या विषयावर अरुण शिवकर तर महिला आणि हवामान यासंदर्भात स्त्री आधार संस्थेच्या अपर्णा पाठक आणि विभावारी कांबळे यांनी मांडणी केली. सदरील परिषदेत वक्त्यांचे स्वागत उपसभापती कार्यालय खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर तर पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन संपर्कच्या मेधा कुळकर्णी यांनी केले तर दुसऱ्या सत्राचे सूत्र संचालन मृणालिनी जोग यांनी केले.

या परिषदेच्या उद्या दि.०९ फेब्रुवारी रोजीच्या सत्रात नागरिकांचा कृती कार्यक्रम या अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कृषी सचिव एकनाथ डवले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे हवामानबद्दल आणि विकासाची शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी केलेले प्रयत्न विविध शासकीय विभागांची मांडणी याबाबत विचार मांडणार आहेत.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image