अर्थसंकल्पातल्या शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली तर अधिकाधिक परिणाम दिसून येईल- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला युवक सक्षम असेल तरच भारत सक्षम होईल, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका वेबिनारला संबोधित करत होते. शिक्षण क्षेत्राचा विकास, गुणवत्ता सुधार, कौशल्य विकास, डिजिटल कौशल्य विकास या गोष्टीवर प्रधानमंत्र्यांनी प्रामुख्यानं भर दिला. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे वापरली तर कमी संसाधनात देखील जास्तीत-जास्त विकास साधता येऊ शकतो असं प्रधानमंत्री म्हणाले. शिक्षण क्षेत्रात सुधारणेसाठी गेल्या ७ वर्षात अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. गावांना ऑप्टिकल फायबरनं जोडणं, डिजिटल शिक्षणासाठी इ-विद्या, १ वर्ग १ चॅनल, डिजिटल लॅब यासारख्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठामुळे कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश मर्यादा राहणार नाही. हे विदयापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं असल्यामुळे देशातल्या युवकांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागणार नाही. या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे नवे शिक्षण धोरण लवकरच आमलात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या  विद्यापीठात दिव्यांगांसाठी विशेष शिक्षणाची सोया केली जाईल असं ते म्हणाले.

पर्यटन, संरक्षण, ऍनिमेशन, गेमिंग यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण  परिषदेनं प्रशिक्षणाचे विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र तसंच शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा करणं, आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्याच्या अंमलबजावणीसाठी धोरण काय असावं याबाबत विचार करणं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं हा वेबिनार आयोजित केला आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणाची अंमलबजावणी वेगानं आणि प्रभावी रित्या लागू करण्यासाठी, महत्वाच्या क्षेत्रांसंदर्भात अशा वेबिनारची मालिका सरकार आयोजित करत आहे.