मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रलंबित मागणीसंदर्भात, राज्याचे मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किसन रेड्डी यांची दिल्ली इथं भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली अशी माहिती सुभाष देसाई यांनी ट्विटरवरून दिली आहे. येत्या मराठी भाषा गौरव दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा असल्याचंही देसाई यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या मागणीसाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियानही सुरु आहे. या अभियानाअंतर्गत येत्या २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशा मागणीची ४ हजार पत्रं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवली गेली. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रांचा हा दुसरा संच होता. याआधी सुमारे एक लाख २० हजार पत्रं पाठवली आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली आहे.