अहमदाबाद इथं आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज झालेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९६ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं मालिकेतले तीनही सामने जिंकून ३-० असं निर्भेळ यश मिळवलं आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करतांना भारताची सुरुवात खराब झाली होती. मात्र ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी केलेली शतकी, तर वॉशिंगटन सुंदर आणि दीपक चहर यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताला ५० षटकात सर्वबाद २६५ धावा करता आल्या. श्रेयस अय्यर यानं सर्वाधिक ८० तर ऋषभ पंत यानं ५६ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या वतीनं, जेसन होल्डर यानं ४, अलझारी जोसेफ आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी २ तर ओडिअन स्मीथ आणि फॅबिन अँलन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठी २६६ धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरुवातही खराब झाली. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. अखेरीस केवळ ३७ षटकं आणि एका चेंडूंत वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ केवळ १६९ धावा करून माघारी परतला. भारताच्या वतीनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ तर दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

या मालिकेनंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. हे तीनही सामने कोलकत्त्यातल्या ईडन गार्डनवर होणार आहेत. पहिला सामना १६ फेब्रुवारीला, दुसरा १८ फेब्रुवारीला तर तिसरा सामना २० फेब्रुवारीला होणार आहे.