भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी विजय

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत भारतानं 2 गडी बाद 199 धावा करत श्रीलंकेपुढे 200 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र पाहुण्यांना 20 षटकांत 6 गडी बाद केवळ 137 धावाच करता आल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीनं 11 धावांची भागीदारी करून संघासाठी भक्कम पाया रचला. भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यरनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान महिला क्रिकेटमध्ये, क्वीन्सटाउन इथं झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी असलेलं 252 धावांचं लक्ष्य भारतीय महिला संघानं 4 गडी गमावत 46 षटकांत पूर्ण केलं. तत्पूर्वी यजमान न्यूझीलंड संघानं 9 गडी बाद 251 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे. ही मालिका न्यूझीलंडने 4-1 अशी जिंकली आहे.