19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विक्रमी पाचव्यांदा अजिंक्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 19 वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला आणि विक्रमी पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 45 व्या षटकात सर्व गडी बाद 189 धावा केल्या. जेम्स रीवनं त्यात 95 धावांचं योगदान दिलं.

भारताच्या राज बावानं 5 तर रवी कुमारनं 4 गडी बाद केले. उत्तरादाखल भारताच्या शेख रशीद आणि निशांत सिंधु यांच्या प्रत्येकी 50 धावांच्या बळावर भारतानं अठ्ठेचाळिसाव्या षटकात 6 गडी गमावून विजय साध्य केला. यापूर्वी भारतानं सन 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये हा करंडक जिंकला होता. विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाख रुपयांचं रोख बक्षीस बी सी सी आय चे सचिव जय शहा यांनी जाहीर केलं आहे.