कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र जोखीम किंवा लक्षणं नसलेल्यांची कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं ICMR चं स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या किंवा इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी असा सल्ला ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज नसल्याचं ICMR नं म्हटलंय. आंतरराज्य प्रवास करणारे प्रवासी, रुग्णालयातून घरी सोडले जात असलेले कोरोना रुग्ण यांचीही कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. याशिवाय कुठलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी उदा. रेल्वे स्थानकं, बाजारपेठा इथं कोरोना चाचणी करणं गरजेचं नसल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलंय. सर्दी, ताप, घसा खवखवणे, चव किंवा वास जाणे, श्वास घेताना त्रास यासारखी लक्षणं असलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले ज्येष्ठ नागरिक किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस किंवा किडनी आजाराने त्रस्त व्यक्ती, लठ्ठपणा या आजारांनी त्रस्त व्यक्तींनी चाचणी करावी, असा सल्लाही ICMR नं दिलाय. परदेशातून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणीच्या नावाखाली डॉक्टरांनी कुठलीही अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलू नये. तसंच लक्षणं नसलेल्या कुठल्याही व्यक्ती, गर्भवतींची कोरोना चाचणी करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे.