अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दूध भेसळीस आळा घालण्यासाठी कारवाई सत्र सुरू

 

पुणे :  जिल्ह्यातील दूध भेसळीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू असून डिसेंबमध्ये ३०० किलोग्राम तर २१ जानेवारी २०२२ रोजी ७ लाख १२ हजार २६४ रुपये किमतीची व्हे-पावडर जप्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने  ८ जुलै २०२१ रोजी नगर जिल्ह्यातून पुरवठा झालेल्या दुधाच्या टँकरवर बारामती येथे कारवाई करत २ लाख २९ हजार ४१७ रुपये किमतीचा ८ हजार ४९७ लीटर गायीच्यां दूधाचा साठा नष्ट केला होता. या नमुन्याचा अहवाल मानवी सेवनास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे २९ जुलै २०२१ रोजी दूध विक्रेता राजाराम खाडे यांच्या ताब्यात भेसळकारी पदार्थ व दुधाचा साठा आढळून आल्याने त्यांच्याकडून गाय दूध, व्हे पावडर व लिक्विड पॅराफिनचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दूध संकलन केंद्रामध्ये भेसळकारी पदार्थ व्हे- पावडर आढळून आल्याने त्यांचेकडून ५१ हजार २५६ रुपये किमतीच्या ३०० किलो व्हे- पावडरचा साठा जप्त केला होता.

बारामती येथील में साई ट्रेडिंग कंपनी या विनापरवाना घाऊक विक्रेत्याकडून २१ जानेवारी २०२२ रोजी विविध प्रकारच्या व्हे पावडरचे ८ नमुने घेऊन उर्वरित ७ लाख १२ हजार २६४ रुपयांचा साठा खरेदी विक्रीचा तपशील नसल्याने तसेच या साठ्याची विक्री दूध भेसळीकरिता होत असल्याच्या संशयावरून जप्त केलेला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्र, दूध प्रकिया केंद्रांनी (डेअरी) त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकाप्रमाणे असल्याची खात्री करुनच ते पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे व जनतेस निर्भेळ दूध मिळण्याकरिता हे प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नामध्ये सहकार्य करावे. कायद्यातंर्गत तरतुदींचा भंग करुन व्यवसाय करणाऱ्या दूध व्यवसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली आहे.