देशभरात ओमायक्रॉनचे ३ हजार १०९ रुग्ण बरे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेले एकूण ८ हजार २०९ रुग्ण देशभरात आढळले असून त्यातले ३ हजार १०९ बरे झाले आहेत. सर्वाधिक एक हजार ७३८ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्याखालोखाल पश्चिम बंगालमधे एक हजार ६७२ रुग्ण आणि राजस्थानात एक हजार २७६ रुग्ण आढळले आहेत. २९ राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधे ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आहे. कालच्या दिवसभरात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत ६ टक्के वाढ झाली. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत १५७ कोटी २० लाख मात्रा देऊन झाल्या असून त्यातल्या ३९ लाख ४६ हजारापेक्षा जास्त मात्रा गेल्या २४ तासात टोचण्यात आल्या. काल दिवसभरात एक लाख ५१ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोविडमुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २७ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत म्हटलंय की आतापर्यंत ३ कोटी ५२ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल दिवसभरात २ लाख ५८ हजार नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची संख्या १६ लाक ५६ हजार झाली आहे. देशभरात आतापर्यंत ७० कोटी ३७ लाख कोविड चाचण्या झाल्या आहेत.