देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. कालच्या दिवसात ९१ लाख २५ हजार लस मात्रा दिल्या गेल्या. १५ ते १८ वयोगटातील मुलांना ३७ लाख ४४ हजारापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.या वयोगटात लसीकरण सुरु झाल्यापासून १५ ते १८ वर्षाच्या मुलांना सव्वा कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या उत्साहाचं कौतुक केलं आहे, तसंच या लसीकरणाचा एवढा टप्पा गाठल्याबद्दल मुलांचं अभिनंदन देखील केलं आहे.राज्यात आतापर्यंत १३ कोटी ६५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.