95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदगीर इथं होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उदगीरला साहित्य महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी सर्वांनुमते ही घोषणा करण्यात आली. माणसाला केंद्रबिंदू मानून, मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसंच इतरही प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे 'काळोखाच्या पारंब्या'या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित ३५ वं मराठवाडा साहित्य संमेलन, नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचं जळगाव इथं १४ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेलं साहित्य संमेलन तसंच सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्राचं अध्यक्षपदही सासणे यांनी भूषवलं आहे.