लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वर्धक मात्रांसंदर्भात लवकरच दिशानिर्देश जारी करणार- डॉ. भारती पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत, बालकांचं लसीकरण तसंच जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे यांना लसीची तिसरी मात्र देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उस्मानाबाद इथं बातमीदारांशी बोलतांना ही माहिती दिली. कोरोना संसर्ग आणि ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्भवलेल्या स्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे असं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद हा आकांक्षीत जिल्ह्यांच्या वर्गवारीत आहे. त्यामुळे इथल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. उस्मानाबादसाठी मंजूर केलेल्या आयुष्य रुग्णालयाकरता जागेचा निर्णय झाल्यावर, हे केंद्र तात्काळ सुरू करायला केंद्र सरकार उत्सुक आहे. इथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभ्यास करून लवकरच मंजुरी दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या स्त्री रुग्णालयात महिला आणि बाल संगोपन विभागासाठी शंभर खाटांचे विस्तारीकरण करता यावं यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.