राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नौदलाच्या किलर तुकडीला राष्ट्रपती सन्मानचिन्ह प्रदान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतींचं सन्मानचिन्ह २२ व्या मिसाइल व्हेसल स्क्वॉड्रनला प्रदान केलं. किलर स्क्वॉड्रन नावानंही हे पथक ओळखलं जातं. निशान अधिकारी लेफ्टनंट युद्धी सुहा यांनी हे सन्मानचिन्ह राष्ट्रपतींकडून स्विकारलं. राष्ट्रपतींकडून सुरक्षा दलांच्या कुठल्याही तुकडीला दिलं जाणारं हे सर्वोच्च सन्मानचिन्ह आहे. यावेळी राष्ट्रपतींनी या तुकडीतल्या सर्व अधिकारी आणि नाविकांचं अभिनंदन केलं. स्वर्णिम विजय वर्ष साजरं करत असतानाच हे सन्मानचिन्ह प्रदान करणं ही उत्तम वेळ असल्याचं ते म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात निर्माण होत असलेल्या भूराजकीय आव्हानांच्या काळात देशाला महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीच्या काळात नौदलानं बजावलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. कोविड १९ काळात भारतीयांना मायदेशी आणण्यात आणि ताऊते चक्रीवादळाच्या दरम्यान बचाव कार्यात नौदलानं महत्त्वाची कामगिरी केली असं त्यांनी सांगितलं. या निमित्त टपाल विभागाकडून एका विशेष तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.