बारा विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरानंतर प्रश्नोत्तराच्या तासातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी केला. त्यावेळी विरोधी सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत निलंबन मागं घेण्याची मागणी केली. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं, असं आवाहन नायडू यांनी या सदस्यांना केलं. मात्र, काँग्रस, राष्ट्रवादीकाँग्रेस, आप आणि द्रमुकसह विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. आपचे सदस्य संजय सिंग यांच्या वर्तनाबद्दल आक्षेप घेत अध्यक्षांनी त्यांना सभागृहाबाहेर नेण्यासाठी मार्शलला पाचारण केलं आणि गोंधळातच कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करत असल्याचं जाहीर केलं. संसदेच्या या अधिवेशनाकरता पुढची रणनिती ठरवण्यासाठी दोन्हा सभागृहांमधल्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झाली.