सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याच्या शक्यतेनं जिल्हा प्रशासनानं सर्व हॉटेल्स, खंडाला-लोणावळा इथले बंगल्यांचे मालक यांना मालकांना नोटीस बजावली आहे. निर्बंधांचं पालन केलं नाही तर कायदेशीर कारवाई करायचा इशारा प्रशासनानं दिला आहे. शिर्डी इथल्या साई बाबा यांच्या मंदिरात नववर्षानिमित्तद होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मंदिर प्रशासनानं चोख बंदोबस्त‍ ठेवला आहे. सुरक्षेच्यादृष्टीनं मंदिर परिसरात अतिरिक्तप पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. खबरदारी म्हणून पोलीस दलाच्या वतीनं सुरक्षेसाठी २४ अधिकारी ३१० महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार तैनात केले आहेत. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे रात्री ९ नंतर साईबाबा मंदीराची आतली बाजु आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेबंदी केली केली. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन सर्व साईभक्ता आणि ग्रामस्थांनी देवस्थान परिसरात कुठेही गर्दी करू नये, आणि नियमांचं पालन करत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहान साईबाबा संस्थालनानं केलं आहे. परभणीतही नववर्षानिमीत्त गर्दी न होता परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलिस दलाने अप्पर पोलिस अधिक्षक, ४ उपअधिक्षक, १९ निरीक्षक, ८४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ९१५ पोलिस अंमलदार, आरसीपीच्या तीन प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्सच्या तीन प्लाटून आणि ३०० हून अधिक होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नागरिकांना घरीच राहून नव्या वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन केलं आहे. पोलीसांनी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरात बंदोबस्त वाढवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी हॉटेल तपासणी करावी, तसंच तरुणींची छेड काढणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलीसांना दिले आहेत. मद्यपी वाहन चालकांसह गैरप्रकार रोखण्यासाठी काही ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची कुमक तैनात केली आहे.