आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमधल्या रांची इथं उभारण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्यावेळी ते बोलत होते. भगवान बिरसा मुंडा यांना अल्पआयुष्य लाभलं मात्र त्यांनी आपल्या प्रेरणादायी जीवनानं येणाऱ्या पिढ्यांना दिशा दिली, असं सांगत भारतीय वैभव आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. आदिवासी समुदायातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वराज्याचे महत्त्व भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक भाग म्हणून परिभाषित केले. जेव्हा गांधीजींनी पश्चिमेत वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला. त्याचवेळी भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना इतिहास रचला आणि ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात विशेषत: आदिवासी समाजात त्यांचं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं गेलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.