प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या ५६ व्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची एकूण संख्या आता एक कोटी १४ लाखावर गेली आहे. या मोहिमेसाठी एकूण ७ लाख ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सर्वांना २०२२ पर्यंत घर देण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी देशभरातल्या सर्व घरांच्या बांधकामाला गती दिली असून, निर्धारित वेळेत त्यांचं काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे, असं मिश्र यांनी या बैठकीत सांगितलं.