दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारच्या सर्व सरकारी कार्यालयांतले सर्व कर्मचारी २१ नोव्हेंबरपर्यंत घरातूनच काम करतील, असं दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी वार्ताहरांना सांगितलं. दिल्लीतील सर्व बांधकाम तसंच इमारती पाडण्याची कामंदेखील बंद राहतील. बाहेरून दिल्लीत प्रवेश करणारे ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूकही २१ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. यात अत्यावश्यक सामानाची तसेच पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना वगळण्यात आलं आहे. तसंच दिल्लीतल्या सार्वजनिक वाहतुकीसाठी १ हजार खाजगी सी एन जी बसचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचे विशेष कृती दल तयार केल्याचंही राय यांनी सांगितलं.