भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं उद्या गोव्यात उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार असून कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हा सोहळा रंगणार आहे. द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड हा शुभारंभाचा चित्रपट आहे. तर सेमखोर ही भारतीय चित्रपटला शुभारंभाचा चित्रपट असेल. वेद…द विझजनरी या चित्रपटानं भारतीय कथाबाह्य चित्रपटांची सुरुवात होणार आहे. यावेळच्या महोत्सवात प्रथमच नेटफ्लिक्स, अमेझॉन, झी 5 आणि वायकॉम सारखी ओ टी टी व्यासपीठंही सामील होणार आहेत. यंदा चित्रपट क्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्वाचा पुरस्कार अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना घोषित झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक मार्टिन स्कोरसोझी आणि इस्तावेन झाबो यांना पहिला सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारही दिला जाणार आहे. महोत्सवातल्या आंतरराष्ट्रीय विभागात 73 देशांमधले 148 चित्रपट दाखवले जातील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून 18 खास चित्रफिती दाखवल्या जाणार आहेत. चित्रपट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिलीप कुमार, सुमित्रा भावे, बुद्धदेब दासगुप्ता, संचारी विजय, जीन पॉल बेलमाँडो, बर्टरँड टॅव्हर्नीँअर, ख्रिस्तोफर प्लमर, जॉन क्लॉड कॅरिर या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दिग्गजांना महोत्सवादरम्यान आदरांजली वाहण्यात येणार आहे.