एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज राज्यभर बेमुदत उपोषण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी महामंडळातील श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं आज राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलं आहे. राज्यशासनाप्रमाणे एक एप्रिल २०१६ पासून २८ टक्के महागाई भत्ता लागू करावा, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के प्रमाणे द्यावा, घरभाडे भत्ता ८,१६ आणि २४ टक्के प्रमाणे देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी एसटी श्रमिक संघटना कृती समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात आलं आहे. धुळे मध्यवर्ती बस स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत उपोषण सुरु केलं. या उपाषणात चालक, वाहक सहभागी झाल्यानं अनेक बस फेर्याण रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. सांगलीत समितीचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व कर्मचारी उपोषणाला बसले. या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक,महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सदस्य सहभागी झाले आहेत.