अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी - पीयूष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित इंडियन पीपल्स फोरमच्या व्यापार मेळाव्याला संबोधित करत होते. इतर देशांमधे मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या भारतीय समूहाकरता आपल्या मायदेशात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतात होत असलेल्या अभूतपूर्व वाढीत हातभार लावण्याची ही मोठी संधी आहे, असं ते म्हणाले. देशात व्यापारपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, त्यामुळे अवघ्या पाच वर्षात व्यापार सुलभतेच्या मानांकनात भारतानं १३० व्या स्थानावरुन ६३ व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातल्या राजनैतिक नात्याला पुढच्या वर्षी ५० वर्ष पूर्ण होतील. दोन्ही देशांमधले संबंध आणखी पुढं नेण्यासाठी ही चांगली संधी आहे, असं ते म्हणाले.