प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “नवीन शहरी भारत- शहरी परिदृश्य बदल” या ३ दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या या परिषदेत ७५ शहरी योजना आणि प्रकल्पांचं उद्घाटन तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. उत्तर प्रदेशातल्या ७५ जिल्ह्यांमधील ७५ हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान शहरी घरकुल योजनेअंतर्गत घरांच्या किल्ल्या डिजिटल स्वरूपात पंतप्रधानांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत.तर ७५ सर्वोत्तम गृहनिर्माण तंत्र आणि तंत्रज्ञान यानिमित्त प्रदर्शित केलं जाणार आहे.बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या ‘अटलबिहारी वाजपेयी’ अध्यासनाच्या स्थापनेची घोषणाही पंतप्रधान आज करणार आहेत. राज्यातील ७ स्मार्ट शहरांसाठीच्या ७५ इलेक्ट्रिक बसना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसंच १० स्मार्ट शहरांतील ७५ यशस्वी प्रकल्पांच्या, कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते  होणार आहे.