पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते काल सह्याद्री अतिथीगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाशी बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी, तसंच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करावी यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
याशिवाय पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतही तज्ञांशी आणि यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची चौथी बैठकही काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कांदळवन क्षेत्रातल्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम आणि मध्य मुंबई, तर तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.
कांदळवन प्रतिष्ठानच्या २०२१-२२ साठीच्या ३० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला,तसंच प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठीच्या २५ कोटी रुपयांच्या खर्चाला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसंच सागरतटीय भागात तिवराची लागवड करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.