स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – मुख्य सचिव सीताराम कुंटे

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – मुख्य सचिव सीताराम कुंटे

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण इत्यादी विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, त्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था यांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व विभागांच्या सचिवस्तरीय अधिका-यांना दिले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात आज मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य सचिव यांनी राज्यातील सर्व विभागांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस सर्व विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी तपशीलवार सादरीकरण केले.

मुख्य सचिव आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की,  इंडिया@ 75 या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून, स्वातंत्र्य लढा, संकल्प, संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याभोवती गुंफलेली असावी. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असावेत. स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करणे, त्यांच्या निवासस्थानी भेट देणे, संबंधित जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील  निगडीत महत्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे सादरीकरण, हेरिटेज वॉक, सायकल वॉक या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले.