विविध योजनांतील अनुदान शेतकऱ्यांना तातडीने द्यावे – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

  शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्या –  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी व फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामांचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो का, याबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.