सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी निधीस मान्यता – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

   


मुंबई: कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पूल कोसळल्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी दिले आहेत.

21 व 22 जुलै 2021 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात अनेक रस्ते बंद झाले होते. त्यातच कनेडी (सांगवे) – कणकवली दरम्यानच्या नाटळ मल्हारी नदीवरील सुमारे 57 वर्षापूर्वी बांधलेला मल्हार पुलाचा काही भाग कोसळला होता.  यामुळे नाटळ, दिगवळे, नरवडे यासह दहा गावांचा संपर्क तुटला.  या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री. श्री. चव्हाण यांनी विभागास दिले होते. त्यानुसार, विभागाने सहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंत्री महोदयांकडे पाठविला होता.

कनेडी परिसरातील गावांचा कणकवलीशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून लगेचच मंजूर केला. यामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे)- कुपवडे-कडावलनारुर-वाडोस-शिवापूर-शिरसिंगे-कलंबिस्त-वेर्ले-सांगेली-धवडकी-दाणोली-बांदा रस्त्यावरील गावांचा संपर्क पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image