देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतली आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत देशात ६२ कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ४७ कोटी लोकांना लसीची पहिली मात्रा तर १४ कोटी लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. दरम्यान, एका दिवसात एक कोटी लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम हा लसीकरण मोहिमेतला अविस्मरणीय टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. लस घेत असलेल्यांना आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्यांचं अभिनंदन, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सर्वांना मोफत लस देण्यासाठीची कटीबद्धता यामुळे या मोहिमेला हे यश लाभलं आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडवीय यांनी म्हटलं आहे.