पेगॅासस प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदरोळ संसद अनेकदा स्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी पेगासस हेरगिरीसह विविध विषयांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करावं लागलं. लोकसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्या नंतर पुन्हा गदारोळातच दोन्ही सदनाचे कामकाज सुरू झाले. आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताचं काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम आणि अन्य सदस्यांनी हौद्यात येऊन राजकीय नेत्यांसह इतरांच्या तथाकथित हेरगिरीचा विषय उपस्थित केला. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.

वायएसआर काँग्रेसचे सदस्यही विशाखापट्टणम्‌ प्रकल्पाच्या खाजगीकरणाचा मुद्दा उपस्थित करत या गदारोळात सहभागी झाले. शेवटी सभापती ओम बिरला यांनी दुपारपर्यंत सभागृह स्थगित केलं. राज्यसभेतही काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह इतरांनी पेगॅासस हेरगिरी आणि इतर विषयांवर स्थगन प्रस्ताव दिला. अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव नाकारला. यावरून सभागृहात गदारोळ सुरूच राहिल्यामुळे नायडू यांनी दुपारी १२ पर्यंत कामकाज स्थगित केलं. दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर गदारोळ कायम राहिल्याने कामकाज १ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.