शिक्षण मंत्रालयाच्या देशव्यापी निपुण भारत अभियानाचा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांमध्ये शिक्षणाचा पाया पक्का व्हावा; मुख्यत: अंक ओळख आणि अंक उजळणीचं कौशल्य विकसित व्हावं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एका देशव्यापी अभियानाची आखणी केली आहे. National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy-अर्थात NIPUN Bharat असे या अभियानाचे नाव आहे. या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमात 'निपुण भारत' या अभियानाची एक लघु चित्रफीत, ध्येय गीत आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या शिक्षण विभागांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी विविध पातळ्यांवर होत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून निपुण अभियान राबवण्यात येणार आहे. येत्या २०२६-२७ पर्यंत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये लिहिणं, वाचण आणि अंक उजळणीचं किमान कौशल्य विकसित करणं हा निपुण भारत अभियानाचा मुख्य हेतू आहे.