राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात येत आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असल्याने नद्यांचे पाणी उतरत आहे.

दरम्यान पूरग्रस्त भागात ऑपरेशन वर्षा २१ म्हणजेच संयुक्त मदतकार्य जोमाने सुरु आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसंच सेनादलांची मदत पथकं तसंच वैद्यकीय पथकं कार्यरत आहेत.

आतापर्यंत सुमारे १ लाख ३५ हजार पूरग्रस्तांना सुखरूपपणे बाहेर काढलं असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाने दिली. पुरामुळे ११२ जणांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९९ जणांचा शोध घेण्यात येत आहे. सुमारे ३ हजार २०० पशुधन दगावले आहे.

मुसळधार पावसात दरडी कोसळण्याच्या किंवा पुरात वाहून जाण्याच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य राज्यसरकारनं जाहीर केले आहे. पूरग्रस्त भागातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं बैठक घेत आहेत.

शहरातल्या व्यापारी व्यावसायिकांशी त्यांनी चर्चा केली आणि सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं.चिपळूण शहरातलं पाणी ओसरत आहे परंतु पूर्ण शहरामध्ये साचलेला चिखल काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.पूरग्रस्तांना तयार अन्नाची पाकिटं आणि पिण्याचं पाणी पुरवण्यात येत आहे.वीजपुरवठा तसंच मोबाईल फोनचे टॉवर पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत चिपळूणमधेच राहून मदतकार्यात योगदान देत आहेत.

रायगड जिल्ह्यात सावित्री नदीचा प्रवाहाचा जोर कमी झाला असून महाड शहरात घुसलेलं पाणी ओसरलं आहे. तळई इथं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत घर गमावलेल्यांचं पुनर्वसन करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत या लोकाना पक्की घरे बांधून देण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिलं.

महाड तालुक्यातल्या दुर्घटना ग्रस्त तळई गावाला राणे यांनी आज भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, आणि प्रविण दरेकर उपस्थित होते.सांगली जिल्ह्यात ९४ गावांना पुराचा फटका बसला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर पोहोचली असून सांगली शहराभोवती पाण्याचा वेढा पडला आहे.

मिरज-कागवड राज्यमार्गावर पाणी आल्याने आज सकाळपासून कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. आज सकाळी वारणा धरणातून नदी पात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून शहरालं पाणी लवकरच ओसरेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांनी काल जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. धरणातल्या पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच स्थलांतरितांशी संवाद साधून दिलासा दिला.

पूरस्थितीमुळे जिल्ह्यात २२ हजार कुटुंबं स्थलांतरित झाली आहेत, तर २४ हजारांहून अधिक पशुधन अन्यत्र हलवण्यात आलं आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात करवीर आणि शिरोळ तालुक्यात पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत सार्वजनिक सूचना देणारी जीएसएम यंत्रणा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आली आहे. सौरऊर्जेचा वापर करुन ही यंत्रणा तयार केली असून अत्यल्प खर्चात देखभाल, दुरुस्ती होते.पावसामुळं रस्ते बंद झाल्यानं कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या दूध पुरवठ्यावर आज परिणाम झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी साडे सहा वाजेपर्यंत ६१ टक्के साठा झाला आहे. या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ७२ मिली मीटर पाऊस त्र्यंबकेश्वर मधे झाला. इगतपुरी तालुक्यातलं भावली धरण भरुन वाहत असून तेथे ३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक शहरातही सकाळपासून पावसाच्या सरी कायम आहेत.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image