राज्यात काल १२ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही कोविड १९ च्या नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर साडे शहाण्णव टक्क्याच्या वर गेला आहे. काल १२ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २५४ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७६ हजार ५७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६० लाख ५८ हजार ७५१ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३१ हजार ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ८२ हजार ८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाले आहे. तर मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाही नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सांगली जिल्ह्यात काल १ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात ८०१ नवीन रुग्ण आढळले. सध्या ८ हजार १८९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल या आजारामुळे १९ रुग्ण दगावले.

वाशिम जिल्ह्यात काल बरे झालेल्या ३ रुग्णांना घरी पाठवले. काल ३ बाधित रुग्ण आढळले. सध्या ४९ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात काल दहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. काल एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात काल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात ९ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या ८४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ६ रुग्णांना या आजाराची लागण झाली. सध्या ५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

जालना जिल्ह्यात काल ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ५४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल जिल्ह्यात १ रुग्ण दगावला.

चंद्रपूर जिल्ह्यात काल १६ रुग्ण या आजारातून बरे झाले. काल ६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या ८१ रुग्ण उपचार घेत आहेत.