मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं.मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं, रस्ते जलमय झाल्यानं कित्येक ठिकाणची वाहतूक खोळंबली. जोगेश्वरी, मालाड, दहिसर, सांताक्रूझ, हिंदमाता, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, वरळी, अंधेरी सबवे, सायन, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य होतं.पाऊस थांबल्यानं आता पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं नदीलगतच्या क्रांतीनगर भागातल्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रुळांवर पाणी साचल्यानं आधी ठाणे ते विक्रोळीदरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. तर जलदगती मार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आता रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरु झाली असली तरी, वेळापत्रक कोलमडलं असून, गाड्या उशीरानं धावत आहेत. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.आतापर्यंत शहर भागात ६४ पूर्णांक ४५ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात १२७ पूर्णाक १६ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात १२० पूर्णांक ६७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.संध्याकाळी साडे चार वाजता समुद्राला मोठी भरती असल्यानं, त्या काळात जोरदार पाऊस पडला तर, मुंबईत पाणी भरण्याची शक्यता आहे. तसंच मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.