राज्यात ७ लाख ३८ हजार ४५० नागरिकांना लस देण्याचा नवा उच्चांक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवलेली आहे. त्यात कालही आणखी एका विक्रमाची भर पडली. काल ५  हजार ७५६ सत्रांच्या माध्यमातून एकूण ७ लाख ३८ हजार ४५० नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.

राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ३ कोटी १० लाख ३३ हजार ३४ मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलं आहे.