मुंबईतल्या ५० टक्क्यापेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड १९ विरोधी प्रतिपिंड विकसित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या ५० टक्क्यापेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड १९ अँटिबॉडीज, म्हणजे प्रतिपिंड विकसित झाल्याचं आढळलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि त्यामध्ये लहान मुलांना अधिक बाधा होऊ शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतल्या लहान मुलांचं सेरोलॉजिकल, म्हणजे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण केले आहे.

१ एप्रिल ते १५ जून दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात ५१ पूर्णांक १८ शतांश टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडं आढळली आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत प्रतिपिंड असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असून, ही बाब समाधानकारक मानली जात आहे.

मात्र, या सर्वेक्षणात आढळलेली तथ्ये लक्षात घेता जवळपास ५० टक्के लहान मुलांना यापूर्वीच कोविडची बाधा झाल्याचं, किंवा ती विषाणूच्या सान्निध्यात आल्याचे दिसते. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग कमी करता यावा, यासाठी लहान मुलांना नजरेसमोर ठेऊन आरोग्य शिक्षण देणे, कोविड सुसंगत वर्तनाबाबत जनजागृती करणे, त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करुन कार्टुन जाहिराती, आकर्षक अशा जिंगल्स इत्यादींचा उपयोग करणे इत्यादी सूचनाही या सर्वेक्षण अहवालात केल्या आहेत.