तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना आवाहन

  तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना आवाहन

मुंबई: राज्यात आज दरदिवशी १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने “ऑक्सीजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत. याचा लाभ घेत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत राज्यातील त्यांची ऑक्सीजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी जेणेकरून  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्सीजनची अंदाजित गरज आपण भागवू शकू असे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तसेच याक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील काही मोठ्या ऑक्सीजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, आरोग्य संचालक एन रामस्वामी यांच्यासह मे. लिंडे इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक मोलाय बॅनर्जी, आर.सी कौशिक, मे. जे.एस.डब्ल्यु टेक्नो प्रोजेक्ट प्रा. लि. अध्यक्ष चे गजराज राठोर, मे. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट प्रा. लि. चे संचालक सिद्धार्थ जैन, मे. टाईया निपॉन सॅन्सो इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक निरंजन वैद्यनाथन, मे.एअर लिक्विड इंडिया होल्डिंग्ज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक बर्ट्रेंड मॉनी, मे. कोल्हापूर ऑक्सीजन ॲण्ड एसिटिलीन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाडवे, ऑल इंडिया इंडस्ट्रीयल गॅस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिकू आदी मान्यवर उपस्थित होते.

हाती असलेल्या वेळेत तयारी पूर्ण व्हावी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली असताना ऑक्सीजन निर्माते, वितरक आणि पुरवठादार यांनी केलेले सहकार्य खूप मोलाचे आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच राज्याची ऑक्सीजनची गरज भागवता आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. काही जिल्ह्यात आजही रुग्णसंख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा नवा विषाणू दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहित नाही. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो काही वेळ आहे त्या कालावधीत ऑक्सीजन स्वालंबन मिळवणे गरजेचे आहे. आपण अनलॉक प्रक्रियेमध्येही अनेक गोष्टी हळूहळू उघडत आहोत, यामुळे उद्योग क्षेत्रही अडचणीत आहे, याची आपल्याला जाणीव आहे परंतू आज आपले पहिले प्राधान्य हे लोकांचे जीव वाचवण्याला आहे हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पूर्ण क्षमतेने साठवणूक करावी

राज्यात काल आणि परवा विक्रमी (अनुक्रमे पाच आणि सहा लाख लोकांचे) लसीकरण झाले. आपली लसीकरणाची क्षमता दररोज १० लाख लोकांची असली तरी लसींची उपलब्धता मर्यादित आहे. ही बाब लक्षात घेता नवीन विषाणू आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यात तातडीने आणि दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या उपाययोजना हाती घेता येतील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विशेषत: दुर्गम भागातील ऑक्सीजन साठवणूक पूर्ण क्षमतेने करण्यात यावी, असे आवाहन केले. संकटकाळात आपण सर्वांनी साथ दिल्यामुळेच आपण हे आव्हान पेलू शकलो आणि राज्यातील ऑक्सीजन व्यवस्थापन उत्तमपणे हाताळू शकलो असेही ते म्हणाले. असेच सहकार्य भविष्यकाळात द्यावे असे सांगतांना त्यांनी एकमेकांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत पुढे जाऊ या असेही म्हटले.

राज्यात विशेषत: दुर्गम भागात प्रकल्प उभारावेत – मुख्य सचिव

यावेळी मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी  सर्व ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अंतर्गत राज्याला ऑक्सीजन निर्मितीच्या क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. यासाठी उद्योजकांना प्रोत्साहने देण्यात आली आहेत त्याचा लाभ घेत उद्योजकांनी राज्यात विशेषत: दुर्गम ग्रामीण भागात आपले प्रकल्प उभारावेत, राज्यातील ऑक्सीजन साठवणूक क्षमता वाढवण्यास मदत करावी, ऑक्सीजनची वाहतूक करण्याच्या कामीही शासनाला सहकार्य करावे. त्यांनी आय.एस.ओ टँकर्सची उपलब्धता, ऑक्सीजन फिलिंग पाँईट वाढवणे, नायट्रोजन वाहून नेणाऱ्या टॅंकर्सचे ऑक्सीजन टँकरमध्ये रुपांतर करणे आदी बाबींवर ही उपस्थितांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

राज्य शासनास पूर्ण सहकार्य

कोरोनाशी लढतांना आम्ही सर्व राज्य शासनासोबत असल्याचे स्पष्ट करतांना ऑक्सीजन उत्पादक  कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्यात त्यांना उत्तम सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्राच्या उत्तम ऑक्सीजन व्यवस्थापनाचे कौतूक केले. तसेच महाराष्ट्राचे हे मॉडेल इतर राज्यात राबविण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  ऑक्सीजन साठवणूक, वाहतूक आणि निर्मितीच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image