अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढवल्यानं जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असं त्यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. 

या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन मलिक यांनी केलं आहे.