प्रधानमंत्री जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी ७ देशांच्या परिषदेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कॅनडा, जर्मनी, इटली, फ्रान्स,जपान यु.के. आणि अमेरिका या संपन्न लोकशाही देशांच्या या अनौपचारिक संघटनेनं इतर देशांशी संवाद साधण्याकरता आयोजित केलेल्या परिषदेचं यजमानपद यंदा ब्रिटनकडे आहे. भारतासह, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आमंत्रण आहे. प्रधानमंत्री मोदी दुसऱ्यांदा या परिषदेत सहभागी होणार आहेत.

कोरोना संकटाचा मुकाबला, समृद्ध भविष्यासाठी मुक्त व्यापाराला चालना, जैवविविधतेचं रक्षण, हवामान बदलाच्या आव्हानांना समोरं जाण्यासाठी उपाययोजना आणि खुल्या समाज निर्मितीसाठी सामायिक मूल्यांची जोपासना याच्यासह लोकशाहीच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.