पुणे जिल्ह्यातील कोरोना काळात 47 हजार 857 मे. टन मोफत अन्नधान्याचे वाटप

 

पुणे : कोरोना 19 च्या प्रादुर्भावामूळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मे 2021 ते 18 जून 2021 पर्यंत जिल्हा अन्नधान्य पुरावठा विभागामार्फत जिल्हयामध्ये 47 हजार 857.26 मे टन  मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावास प्रतिबंध करण्यासाठी बेक्र द चेनचे आदेश जारी करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत सवलतीच्या दराने पात्र असलेल्या नागरिकांना हा लाभ देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत गहू व तांदूळ वाटपाबाबत आदेश देण्यात आले होते.  तसेच  केंद्र शासनाच्या दि. 26 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये माहे मे व जून 2021 करीता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्या व्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो अन्नधान्य "मोफत" वितरीत  करण्यात येत आहेत.

अन्नधान्य वेळेत वितरण करण्यासाठी पुणे शहर व ग्रामीण करीता नियोजन करण्यात येवून राज्य  शासनाच्या व केंद्र शासनाच्या दोन्ही योजनाचे धान्य वेळेत अन्न महामंडळाच्या गोदामातून घेवून दोन्ही योजनाचे धान्य प्रत्यक्षात वाटप करणेसाठी स्वस्त धान्य दुकानात पोहोच करण्यात आले. जिल्हाधिकारी   डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: दुरदृश्यप्रणाली मार्फत सर्व तहसिलदारांना सूचना देवुन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सर्व तहसिलदार व परिमंडळ अधिकारी यांनी दुरदृश्यप्रणाली द्वारे रास्तभाव दुकानदारांच्या बैठका घेवून लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाबाबत शासनाने  घालून दिलेल्या नियमांचे पालन  करून अन्नधान्य वितरणबाबत सूचना देण्यात आलेल्या  होत्या.

 राज्य शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे 2021 करीता पुणे जिल्हयासाठी 12278.92 मे. टन गहू व 7816.69 मे. टन तांदूळ असे एकूण 20095.61 मे. टन अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. दि. 18 जून 2021 पर्यंत राज्य शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे 97.08 टक्के वाटप करण्यात आले आहे.

  केंद्र शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे 2021 करीता पुणे जिल्हयासाठी 11629.71 मे. टन गहू व 7747.93 मे. टन तांदूळ असे एकूण 19377.64 मे. टन अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. आज अखेर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे 97.10 टक्के वाटप करण्यात आलेले आहे.

 तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे जून 2021 करीता  पुणे जिल्हयासाठी 5029.89 मे. टन गहू व 3354.12 मे. टन तांदूळ असे एकूण 8384.01 मे. टन अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे. आज अखेर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे 42.41 टक्के वाटप करण्यात आलेले आहे. जिल्हा पुरावठा विभागमार्फत उर्वरीत लाभार्थ्यांना महिना अखेर पर्यंत 100% अन्नधान्य वितरण  करण्याच्या सूचना  जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.